सावधान ! फोनमध्ये चोर घुसताहेत...
मोदींच्या नावाने मोफत 'रिचार्ज' चे आमिष
सायबर चोरट्यांनी पाठवलेल्या लिंकवर प्रोसेस केल्यास मोबाइल किंवा लॅपटॉपचा संपूर्ण कंट्रोल सायबर चोरट्यांकडे जातो. नागरिकांनी या प्रकारांना बळी पडू नये.-- रोहन न्यायाधीश,सायबर गुन्हे विश्लेषक\
पुणे :- 'लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याच्या आनंदात भाजपकडून भारतीयांना मोबाइलचे तीन महिन्यांचे रिचार्ज मोफत देण्यात आहे,' अशी बतावणी करून सायबर चोरटे नागरिकांच्या फोनमध्ये घुसू पाहत आहेत.
'रिचार्ज' मिळविण्यासाठी नागरिकांना मोबाइलवर पाठविलेल्या लिंकद्वारे प्रक्रिया करण्यास सांगितले जात असून, नागरिकांनी त्या लिंकवर क्लिक करताच सायबर चोरटे मोबाइलचा ताबा घेतात. अशा प्रकारचे मेसेज नागरिकांना येत असून, सायबर पोलिस आणि तज्ज्ञांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सायबर चोरटे विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारतात. त्यात शेअर मार्केट किंवा अन्य प्रकारच्या गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक केली जाते. अर्धवेळ नोकरीच्या निमित्ताने दिलेले ऑनलाइन टास्क असो, की सीबीआय किंवा गुन्हे शाखेच्या कारवाईने दाखविलेली भीती असो; अशा विविध कारणांनी लोकांना सायबर गुन्हेगार गंडा घालत आहेत. केंद्रात भाजपप्रणीत सरकार स्थापन होत असल्याने त्याचे निमित्त साधून सायबर चोरटे अँक्टिव्ह झाले आहेत. चोरट्यांकडून हे मेसेज पाठविले जात असून, पुण्यातही अनेकांना हे मेसेज आले आहेत. मात्र, अद्याप अशा प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार पुण्यात आलेली नाही.
सायबर चोरट्यांचा मेसेज काय?
नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याच्या आनंदात भाजपकडून भारतीय मोबाइलधारकांना ५९९ रुपयांचे तीन महिने मुदतीचे रिचार्ज मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी खालील https://pmoffer.online या वेबसाइटवर क्लिक करून प्रक्रिया करा.
लिंकवर क्लिक केल्यास फटका
मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना काही माहिती भरायला सांगितली जाते. ती माहिती दिल्यानंतर मोबाइलचा ताबा सायबर चोरटे घेतात. त्यानंतर सायबर चोरटे नेटबँकिंग किंवा 'यूपीआय'चा वापर करून पैसे ट्रान्स्फर करू शकतात किंवा संबंधिताच्या 'काँटॅक्ट लिस्ट' मधील क्रमांकांना पैशांची मदत मागून इतरांचीही फसवणूक करू शकतात.
0 Response to "सावधान ! फोनमध्ये चोर घुसताहेत..."
एक टिप्पणी भेजें