-->

फ़ॉलोअर

 आंबेडकरांच्या वाटेतील रातकिड्यांनो....

आंबेडकरांच्या वाटेतील रातकिड्यांनो....

राजू बोरकर

७५०७०२५४६७


लोकसभेची निडणूक आली आहे .सर्व पक्षांचे कार्यकर्ते अगदी तन, मन आणि जमलं तर धनाने कामाला लागले आहेत. ज्यांच्या खात्यात पंधरा लाख जमा झाले नाही ते ही गप गुमान दऱ्या अंथरण्यात, उचलण्यात व्यस्त झाले आहेत. त्यांना कधीही पंधरा लाख मिळाले नाही हे दुःख झालं नाही. देशाचं  राजकारणात कोणत्या दिशेला चाललं  आणि त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न मात्र न चुकता तथाकथित आंबेडकर वाद्यांना पडतो. मग हे रातकिडे प्रकाशाच्या अंधार वाटेत नेमका निवडणुकीचा हंगाम बघून आपला सामूहिक किरकिराट करतात. नेहमीप्रमाणे रातकिडे कामाला लागले आहेत. प्रकाशाच्या अंधार वाटेत अशा रात किड्यांचा खूप खूप स्वागत आहे. प्रकाश आंबेडकरांवर कधी घराणेशाहीचा आरोप ठेवला गेला ,कधी हट्टीपणाचा आरोप केला गेला. त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगची मजा उडविण्यात काही रातकिडे स्वतःला धन्य मानतात . आता तर प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेविषयी अनेक अफवांचे पीक येऊन गेले .असे अफवांचे पीक प्रत्येक निवडणुकीत आले. आणि हे रातकिडे पुढे असे पीक काढत राहतील. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युतीत आंबेडकरांनी सहभाग नाकारला ,अशी चर्चा सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया तसेच  इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिली. काहीसा हाच धागा पक्का करत रातकिड्यांनीही आपला सूर मिसळला. कथित युती तोडल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांवर करण्यात आला. आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली युतीचा किंवा मैत्रीचा धर्म पाळणाऱ्यांनी समविचारी मित्र म्हणून आपल्या निर्णय प्रक्रियेत आंबेडकरांना बोलवायला हवे होते. पण आम्ही इतक्या जागा दिल्या आणि आंबेडकरांनी नाकारल्या अशी अफवा याच मित्रांनी पसरविली पण हे हवेवरचे आरोप असून ऑफिशिअली मला निर्णय प्रक्रियेतून डावल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. एकीकडे मित्र म्हणायचं आणि मित्राला सोडून तीन मित्रांनी पार्टी साजरी करायची ही कसली मैत्री ? प्रकाश आंबेडकर सजग नेते आहेत . युती सन्मानपूर्वक व्हायला हवी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं .आणि सन्मानाची वागणूक मिळावी अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे मागील निवडणुकीत वंचित ने घेतलेल्या मतामुळे काँग्रेसच्या अनेक जागांवर उमेदवारांना पराभूत व्हावे लागले ,असे एकतर्फी गणित मांडून काँग्रेस आणि रातकिड्यांनी प्रकाश  आंबेडकरांना आंबेडकरी जनतेत बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण हे गणित वंचितच्या बाजूने मांडायचे झाल्यास काँग्रेसच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे वंचितला अनेक ठिकाणी पराभूत व्हावे लागले असेही मांडता येईल. असेही म्हणता येईल. आपल्या जय पराजयासाठी आंबेडकरी समाजाला कारणीभूत समजणाऱ्यांनी वंचितच्या काही पराभूत जागांसाठी काँग्रेसची अडेलतट्टू भूमिका कारणीभूत आहे हे मान्य करावे लागेल. कारण आंबेडकरी समाज तुमच्या बापजाद्यांची मालमत्ता नाही. आंबेडकरी नेत्यांना एकतर्फे आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणे केवल काँग्रेस आणि संचांचा बालिशपणा आहे. निर्णय प्रक्रियेत मित्र असलाच पाहिजे. त्या प्रक्रियेतून डावलण्यात येत असेल तर मैत्रीच्या सन्मानजनक मर्यादांची पायमल्ली कोणी केली? आपल्या सोयीच्या राजकारणासाठी आंबेडकरी समाजाला हुजऱ्या समजण्याची प्रथा आता बंद करा .तिकडे आम्हाला दोन जागा द्या किंवा त्या बदल्यात केंद्रात आणि राज्यात पुनर्वसन करा म्हणणारा नेता, आठवले आणि भाजपाच्या प्रचारात नाचणारा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सत्तेसाठी किती लाचार झालेत याचे उदाहरण आपल्या सर्वांपुढे आहे. "लाथ मारतो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे त्या खुर्चीला" त्यांच्या भाषणातील हे गाजलेलं वाक्य आहे ते मला अजूनही आठवतं. आणि माणूस सत्तेसाठी इतका कधी लाचार होऊ शकतो यावर चटकन विश्वास बसत नाही. पण लाचारांची फौज बघतोच आहोत . निवडणुकिचा आणि भोतमांगे हत्याकांडाचा सुतराम सबंध असेल असे मला वाटत नाही. पण दात पडलेले पँथर्स आपल्या अनेक लेखात भोतमांगे  हत्याकांडाची आठवण करून देतात . राजकारणाची हवा भलत्याच दिशेला वाहून नेण्याची गरज का वाटते आहे? हे कळायला मार्ग नाही . बाबासाहेबांनी काँग्रेसला जळते घर म्हटले होते . त्याऊपर त्यांनी काँग्रेस ही पिळवणूक करणाऱ्यांची आणि पिळले जाणाऱ्यांची झालेली एकजूट आहे असे म्हटले होते. पण आज  अनेक रिपब्लिकन नेते काँग्रेसच्या वळचणीखाली उभे आहेत. शिवसेना आणि भाजप चुलत भाऊ मावस भाऊ अशा नात्यात वावरतांना  दिसले. आणि आता सख्खे भाऊ झाले. कट्टर हिंदुत्वाचे ढोल पिटणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते मावाळ(?) हिंदुत्ववादी असणाऱ्या काँग्रेसला नेहमी शत्रू म्हणून बघत आले. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे मित्र झाले. अजित पवारांना भाजपकडे कधीही थारा नाही असे म्हणणारे फडणवीस अजित पवारांचे यार झाले. घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ असे म्हणणाऱ्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी धडपटणाऱ्या इतर नेत्यांप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनीही प्रयत्न केला. तेव्हा मनोज जरांगेच्या सोबत झालेल्या आंबेडकरांच्या चर्चेला प्रकाशाच्या अंधार वाटेत किरकीराट करणाऱ्या रातकिड्यांनी भोतमांगे हत्याकांडांची आठवण  देऊन राजकारणात जातीचा रंग भरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस ,सेनेने दिलेल्या सर्व जखमा भरून निघाल्या नाहीत तरी मैत्री सुरूच आहे. एवढेच नाही तर लाचारीने त्यांच्या मागेपुढे मिरवणारे ही अनेक लाचार रिपब्लिकन नेते आहेत हे सर्व माफ .मग प्रकाश आंबेडकरांनी शोधलेल्या पर्यायाला विरोध करण्याचे कारण काय ? राजकारणात अनेकांनी नवीन प्रयोग केलेले आहेत. पुलोद ही संकल्पना नव्या प्रयोगाची नव्हती काय? शिवसेनेतून बाहेर पडून आपले नवे अस्तित्व मांडणाऱ्यांनी नवा प्रयोग केला नाही काय? राजकारणात अशा नव्या प्रयोगांची फार मोठी मालिका आपल्याला बघायला मिळेल. मग प्रकाश आंबेडकर वेगळं राजकारण करतायत तर काही भाडखाउंना ते प्रयोग का सलतात ?आज प्रकाश आंबेडकरांकडे समाजाची अपेक्षा वाढली आहे .तसेच ओबीसींची, बहुजन समाजाची माणसं जोडली गेली आहेत. प्रकाश शेडगे सारखे ओबीसी नेते आंबेडकरांशी चर्चा करतात आहे, हे प्रकाश आंबेडकरांचं संघटन कौशल्य आहे. राजकारणातील मुत्सद्दगिरी आहे. युतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आंबेडकरांचाच नाही .त्या युती धर्माचं पालन करण्याची जबाबदारी युतीतील इतर पक्षांची ही आहे. येणाऱ्या निवडणुकीत ही युती फिसकटली आणि काँग्रेसचे काही उमेदवार पडले तर त्याचं खापर आंबेडकरांवर फोडायला कोणी धजाऊ नये. युतीतील अंतर्गत कलहामुळे वंचित चे उमेदवार पडलेत असे म्हणायला आम्हीही मोकळे आहोत .वंचित बहुजन आघाडी दखल घेण्याइतपत मोठी झालीय. त्यामुळेच दात नसलेले बोबडे आणि नखं कापले गेलेले पॅंथर प्रकाशाच्या अंधार वाटेवर चाचपडताना दिसतात .भूतकालीन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना भाजपाची बी टीम म्हणणारे अजित पवार हे स्वतःच भाजपवासी झालेत. त्यामुळे त्यांच्या उरल्यासुरल्या चेल्या चपाट्यांयांनी प्रकाश आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हणण्याचं धाडस करू नये. ज्या शेंबड्यांना राजकीय विश्लेषण करता येत नाही ते गोपीचंद पडळकर मते खाऊन गेला म्हणतात. खरेतर गोपीनाथ पडळकर वंचितला मते देऊन गेले. वंचित चा भाव वाढवून गेले. वंचितकडे तिकीट मागून त्यांनी वंचित हा सबळ पक्ष आहे हे मान्य केले होते. तसे नसते तर पडळकर अन्य रिपब्लिकन गटाकडे तिकीट मागत फिरले असते. साकोली विधानसभेत सेवक वाघाये या काँग्रेसच्या माजी आमदाराने तिकीट घेऊन वंचित साठी निवडणूक लढली. अगदी काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांची भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे फार मोठी सभा झाली. आणि सेवक वाघाये  परत  लोकसभेची तिकीट मागायला गेले. प्रकाश आंबेडकरांनी तिकीट नाकारलं. हे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचे वाढतं वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत सेवक वाघाये  परत काँग्रेसवासी झाले म्हणून ते वंचित वर थुंकून गेले गोपीचंद पडळकर भाजपवासी झाले म्हणून ते वंचित वर थुंकून गेले असे पोरकट विश्लेषण मांडणाऱ्यांची किव येते. राजकारणात इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची संख्या कमी नाही. शिंदेंबरोबर गेलेले आमदार आज त्यांच्या सोबत नाहीत .अमरावतीत बच्चू कडूंनी घूमजाव केला. अनेकांनी आमदारकीचा राजीनामा दिला. निलेश श्रीलंकेचा राजीनामा सगळ्यांना ठाऊक आहे. लंकेनी राजीनामा देऊन दंड थोपटले. ही  प्रातिनिधीक उदाहरणं झाली. असे पक्ष बदलणारे अनेक नेते आपण रोज पाहतो. मग पडळकर यांच्या जाण्याचे दुःख वंचित ने का बाळगावे? आणि दात नसलेल्या पॅंथरसने पडळकर गेले अशी हाकाटी का करावी ? तसाही पडळकर यांचा आणि त्यांचा काय संबंध? पडळकर पचकाभर थुंकून गेले नाही ते वंचितचं वजन वाढवून गेलेत, हे हातबल पँथर्स ला कोणी सांगावं? राजकारणात कुणीच कुणाचा होत नाही? काकांनी वाढवलेले पुतणे काकांना सोडून गेलेत .ही महाराष्ट्रातील उदाहरणे काही शेंबडे कसे विसरतात? राजकारणात कोणी कोणाचा मित्र नाही आणि कोणी कुणाचा कायम शत्रू नाही .जिथे घरातील भाऊबंदकी संपते तिथे वंचितला पडळकर यांची काय पर्वा ? वंचित कडे पडळकरांसारखे आणखीही अनेक लोक आलेत त्यांची पण बेरीज झाली पाहिजे. दात नसलेल्या पॅंथरसने त्याची पण बेरीज करावी .आंबेडकरी समाजात नेत्यांची कमी नाही .आंबेडकरी विचारधारा सांगणारे सर्व नेते आणि त्यांचे पक्ष असले तरी सर्वावर टीकांचा वर्षाव होतच नाही. निवडणूक आली की मायावती आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावरच अधिक टीकांचा वर्षाव होतो. हे आजपर्यंत कुणाच्याही लक्षात यावं इतकं स्पष्ट आहे. याचा अर्थ असा, दात पडलेले पँथर्स ,अंधारात चाचडणारे रातकिडे हे सुपारी बाज दलाल आणि भाडखाउ असल्यामुळे ते आपल्या लेखणीतून विरोधी विचार मांडत असतात. कारण आंबेडकरी विचारधारा किंवा आंबेडकरवाद सत्तेपर्यंत पोहचू नये ही योजना येथील प्रस्थापित समाज व्यवस्थेने आखून घेतली आहे. त्यामुळे असे हस्तक आपल्या लेखणीतून विरोधी विचार पेरत असतात. यांना एकच प्रश्न विचारा. प्रकाशाच्या अंधार वाटेवर प्रवास करणाऱ्या रातकिड्यांनो तुमचा पक्ष कोणता? एवढं फक्त सांगा .मला माहित आहे ते कधीही सांगू शकणार नाही. तेव्हा त्यांना ठणकावून सांगा, आंबेडकरांच्या वाटेतील रातकिड्यांनो खबरदार....

____________________

राजू बोरकर

मु. पो. ता. लाखांदूर

जि. भंडारा

७५०७०२५४६७

____________________

0 Response to " आंबेडकरांच्या वाटेतील रातकिड्यांनो...."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article