आंबेडकरी चळवळीची क्रांतिकारी मशाल : डी. एन. मोरे
संजीव भांबोरे
परभणी (ऑल इंडिया प्रतिनिधी) :- आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे डी. एन. मोरे दादा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक निष्ठावंत कार्यकर्ते चळवळीचे काम करू लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श प्रेरणा मानून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण झाले. त्या पैकी आंबेडकर घराण्यांशी घनिष्ठ स्नेहपूर्ण संबंध असणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक वेळा भेटलेले आदरणीय डी. एन. मोरे दादा हे नाव म्हणजे एक आंबेडकरी चळवळीतील सृजनशील नेतृत्व करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसे पहाता दादांची जन्मभूमी विदर्भ असली तरी कर्मभूमी मात्र मराठवाडा आणि विदर्भ आहेत.
डी.एन.मोरे दादांचा जन्म 10 सप्टेंबर 1910 रोजी अकोला जिल्हयातील मोठेगाव ता. रिसोड( सध्याचा वाशिम जिल्हा) या गावी झाला. त्यांचे मुळ नाव दौलतराव निंबाजी मोरे होते पण त्यांना डी.एन.मोरे याच नावाने ओळखले जाते आणि ते डी.एन.मोरे याच नावाने संपूर्ण आंबेडकरी चळवळीत प्रसिद्ध राहिले आहेत . दादांची साधी राहणी आणि उच्च विचार श्रेणी असा पिंड होता. दादांचे शरीर बांधा मजबुत आणि उंचापुरा होता. डोक्यावर नेहमी निळी टोपी असायची. शांतप्रिय व्यक्तीमत्व आणि हसतमुख चेहरा असायचा.दादांच्या व्यक्तीमत्व दरारा प्रसिद्ध आहे, की कोणतेही शासकीय - प्रशासकीय आधिकारी दादांना जय भीम! घालायचे ही बाब आवर्जून नमूद करत आहे. दादांचे पुर्वीचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाल्यावर ब्रिटिश सरकारच्या पोलीसात काही काळ पोलीस म्हणून नोकरी केली. दादांचे मोठे बंधू झाबू मोरे ब्रिटिश सैन्यात सैनिक होते. पण दादांचे मन जास्त काळ ब्रिटिश पोलीसात रमले नाही. लहानपणापासूनच त्यांच्या अंगी नेतृत्व - वक्तृत्व हे गुण होते. त्यांना लहानपणी अस्पृश्यतेचे अनेक चटके सहन करावे लागले. प्रस्थापित व्यवस्थेची त्यांना प्रचंड चीड आली होती; म्हणून त्यांनी पोलीसांच्या नोकरीला तिलांजली देऊन स्वतः च्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा विचार न करता आंबेडकरी चळवळीत स्वत :हून निःस्वार्थ पणे झोकून दिलं होतं. समाजासाठी - चळवळीसाठी आयुष्यभर कार्य करणाऱे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून डी.एन.मोरे दादा हे नाव विशेषतः खूप मोठे आहे.
डॉ. बाबासाहेबांना प्रभावित होऊन सामाजिक कार्यास सुरूवात केली. 1953 शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे औरंगाबादला मार्गदर्शन केलं होते, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.दादा ही त्या मार्गदशनाला आर्वजून उपस्थित होते. डी. एन. मोरे दादांच्या सामाजिक कार्याबद्दल बाबासाहेबांना माहीत होते, तेव्हा बाबासाहेबांनी डी.एन.मोरे दादांना जवळ बोलावून घेतलं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, "माझी लेकरे एक हात उड्या मारत नाही तर दहा हात उड्या मारतात." बाबासाहेबांच्या ह्या शब्दांनी डी.एन.मोरे दादांचे मन गहिवरून आले आणि तितक्याच जोमाने चळवळचे काम गावोगावी जाऊन करू लागले. एक - एक कार्यकर्ता घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल.चळवळीच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क वाढला. समाजातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी दादांनी आंबेडकरवादी क्रांतीचा वसा घेतला आणि आंबेडकर चळवळीतील एक सृजनशील - कृतीशील नेतृत्व मराठवाड्यातील परभणी जिल्हात मोठ्या उमेदीने उदयास आले.
डी.एन.मोरे दादांनी सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उल्लेखनीय कार्य केले आहे. दादांच्या कार्याला प्रस्थापित सवर्ण वर्गानी कडाडून विरोध केला होता. काही गावातील कर्मठ लोकांनी गावात येणास आणि सभा घेण्यास बंदी घातली होती ;तरीही दादांनी माघार घेतली नाही. आपले कार्य सतत चालू ठेवले. निझाम राजवटीविरुध्द, त्यांच्या आत्याचारी प्रवृत्तीला विरोध केल्यामुळे निझामानी दादांना सहा महिने मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर असलेल्या व्याड कॅम्पात( 1946 मध्ये ) भूमीगत राहावे लागले. तसेच दादांना सत्याग्रह - आंदोलन आणि मोर्चा काढण्या बद्दल अनेक वेळा कारावास भोगावा लागला होता. 1953 साली यवतमाळ येथे भुमीहीन सत्याग्रह केल्या मुळे यवतमाळ येथील तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. तसेच 1959 च्या आंदोलन केले होते त्या बद्दल ही दादांना कारावास भोगावा लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनात दादांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भुमीहीन सत्याग्रह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होता. मराठवाडय़ातील जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील यवतमाळ, अकोला, वाशिम आदी ठिकाणी जाऊन डी.एन.मोरे दादांच्या नेतृत्वाखाली भुमीहीन सत्याग्रह चालू होते. या सत्याग्रहाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा प्रमाणात प्रयत्न केले. आष्टी, हिंगोली, परभणी, यवतमाळ, रिसोड आदी ठिकाणी विस हजार एकर (20,000एकर )सिलिंगची जमीन वाटप करण्यात दादांचा सिंहाचा वाटा आहे. अंध, अपंग, महारोगी पीडित - दुर्बल घटकांतील लोकांसाठी रिपब्लिकन झोपडपट्टी संघामार्फत अनेक वस्त्या, गावे, नगरे बसविण्याचे काम दादांनी केलेले आहेत. तसेच या संघामार्फत भीमनगर व रोशन खाँ मोहल्ला बसवलेली आहेत. रिपब्लिकन झोपडपट्टी संघामार्फत हिंगोली - परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावे झोपडपट्टी बसवण्याचे काम दादांनी केलेले आहेत. बहुजन- मागासवर्गीय समाजाच्या वेगवेगळ्या समस्यासाठी शासन दरबारी आंदोलना मार्फत, सत्याग्रह मार्फत न्याय मिळवून देण्याचे काम आदरणीय दादांनी केलेले आहे. ब्राह्मणगाव येथील घटना एका बहूजन महिलेवर अत्याचार केलेल्या प्रकरणात त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा प्रमाणात प्रयत्न केले होते. महत्त्वाची भूमिका आहे. अशा किती तरी प्रकारच्या अन्याय- अत्याचार आणि अत्याचारग्रस्त पीडित- शोषित समाजातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी दादांनी प्रयत्न केलेले आहेत. शेड्युल कास्ट फेडरेशन चे पहिले अध्यक्षपद परभणी जिल्ह्यातील आदरणीय डी. एन मोरे दादांनी भूषविलेले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशन च्या मार्फत पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे 1951मध्ये गंगाखेड राखीव मतदार संघातून आदरणीय दादांनी निवडणूक लढवली पण फक्त पंधराशे मताने पराभव पत्करावा लागला. याचबरोबर परभणी हिंगोली लोकसभा ही लढवली परंतु; दादानां येथे ही हुलकावणी मिळाली. यश मिळाले नाही यानंतर दादांनी राजकारणाला कलाटणी दिली आणि समाजकारणात जास्त रमले. तसेच त्यांनी समाजाच्या हितासाठी आयुष्यभर भरीव कार्य करीत राहिले आहे. 14 मे 1961 मध्ये परभणीला संयुक्त महाराष्ट्राची समिती सभा भरली होती. त्या सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय डी. एन मोरे दादांची उपस्थिती होती स्टेजवर अण्णा गव्हाणे, नाना पाटील, भाऊसाहेब मोरे आणि डी. एन. दादा हे चारच सदस्य स्टेजवर उपस्थित होते. 24 नोव्हेंबर 1961 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदिवासी अधिवेशन अलिगड येथे भरले होते. त्यामध्ये दादांची महत्त्वाची भूमिका आणि सहभाग राहिलेला आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. त्या कार्यक्रमातही आदरणीय मोरे दादा उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा लाखो अनुयायांसह घेतलेली आहे. तसेच त्यांनी पुढे 7 डिसेंबर 1961 रोजी अनुसूचित भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांना पुसेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे. हा ऐतिहासिक प्रसंग दादाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा आहे. दादांची असे विविध चळवळीचे कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण अशीच राहिलेली आहे. 8 ऑगस्ट 1961 मध्ये दलित अत्याचार प्रकरणी चिरणे, कापणे अशा दादांच्या भाषणातील विद्रोही शब्दामुळे कलेक्टरने नोंद घेऊन दादांना समज देण्याचे काम केले. म्हणूनच असे मला वाटते की आंबेडकरी चळवळीची क्रांतिकारी मशाल म्हणजे डी.एन.मोरे दादा. हे समीकरणच सृजनशील आहे, असे मला वाटते. कुठेही अन्याय - अत्याचार घडो तिथे दादा हजरजबाबीपणा उपस्थित राहून समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असत. दादांनी आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक प्रबोधनासाठी महाराष्ट्रातील आधुनिक संत गाडगे बाबा, रिसोडचे संत अमरदास बाबा आणि कैकाडी महाराज या सामाजिक संता सोबत सामाजिक प्रबोधनासाठी चर्चा केली आहे. दादांनी त्यांना वैयक्तिक भेटून समाजाच्या उन्नतीसाठी दादांनी कार्य केले आहे. एकंदरीत राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दादांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रतिसरकारच्या विरुद्ध क्रांतिसिंह नाना पाटील यांची आदरणीय डी. एन मोरे दादा प्रत्यक्ष भेटले होते. 19 एप्रिल 1962 रोजी त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना पाठिंबा दर्शविला होता. सतरा जुलै 1962 रोजी ग्रामपंचायत कार्यालय टाकळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला होता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात आदरणीय मोरे दादांनी बाबासाहेबांची प्रतिमा- फोटो लावण्यांचे कार्य केले आहे. 21 नोव्हेंबर 1962 रोजी हिंगोली शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी सहा गुंठे जागा जिल्हाधिकारी यांनी दादांच्या मागणीवरून दिली आहे. हे आजच्या पिढीने विसरतात कामा नये. 18 डिसेंबर 1962 रोजी जेव्हा भारतावर चिनने आक्रमण केले तेव्हा आदरणीय डी.एन.मोरे दादांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने परभणी येथे आंदोलन केले. 16 मे 1963 मध्ये ग्रामपंचायत मिरखेल येथील कार्यालयात बाबासाहेबांचा फोटो लावण्याचे काम आदरणीय दादांनी केली आहे. 29 मे 1963 रोजी आमदार शांताबाई दाणी यांची हिंगोलीत प्रचंड मोठी सभा झाली होती. त्या सभेला दादांची प्रमुख उपस्थिती होती. एक नोव्हेंबर 1963 रोजी औंढानागनाथ ग्रामपंचायत मध्ये आदरणीय दादांच्या मागणीवरून ग्रामपंचायत कार्यालय मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आले आहे. तसेच 1 फेब्रुवारी 1963 रोजी शिरसगाव येथील महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दादांनी आंदोलन केले आणि त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. 8 एप्रिल 1963 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सेलू येथे बसवावा यासाठी मुख्यमंत्र्यांना ठराव पाठवण्याचे काम दादांनी केलेले आहे. राजाभाऊ खोब्रागडे, रा. सु. गवई , कवाडे भाऊसाहेब मोरे आणि डी.एन.मोरे दादांची आठ जुलै 1964 रोजी औरंगाबाद येथे बैठक होती. त्या बैठकीत दादा हे उपस्थित होते. दादांनी परभणी - हिंगोली जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या समस्या त्या बैठकीत मांडल्या होत्या. परभणी जिल्ह्यातील पेडगाव ग्रामपंचायती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याचे काम 23 ऑगस्ट 1964 दादांनी केली आहे. दादांच्या अशा कार्याला मानाचा मुजरा 01 ऑक्टोबर 1964 रोजी नवी दिल्ली येथे आंबेडकर भवन स्थापन करावे या कारणास्तव 50, 000 हजार लोकसमुदाय याचा मोर्चा दादासाहेब गायकवाड, शांताबाई दाणी, भाऊसाहेब मोरे, आणि आदरणीय डी.एन.मोरे दादा यांनी काढलेला आहे. 21 फेब्रुवारी 1964 रोजी कळमनुरी येथे सत्याग्रह चालू असताना दादांना अटक करून परभणीच्या तुरुंगात ठेवले होते. 27 मार्च 1965 रोजी समाजातील आंधळे, लंगडे, अपंग आणि महारोगी यांच्या हक्कासाठी दादांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि मोर्चा काढलेला आहे. या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दादांनी खूप प्रयत्न केले आहे. सात ऑगस्ट 1965 रोजी एक हजार लोकांचा मोर्चा परतूर येथे सरकारी जमीन देणे यासाठी काढलेला होता. त्यांना यशही मिळाले आहे. 12 ऑगस्ट 1965 रोजी परभणी जिल्ह्यातील रेनाखळी येथे बौद्ध कुटुंबावर झालेला अन्याय पाहून दादांना प्रचंड राग आला होता त्यांनी तत्काळ कलेक्टरला भेटून निवेदन दिले आणि बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आणि न्याय मिळवून देण्याचे काम दादांनी केले आहे. 29 ऑगस्ट 1965 रोजी अस्पृश्यता आयोग दिल्ली डाग बंगला यांची परभणी येथे भेट व त्यांच्या पुढे साक्ष दिली ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा कडक बनवावा आणि त्याची अमलबजावणी करावी असे नमूद केली होते. 18 ऑक्टोबर 1965 रोजी लालबहादूर शास्त्री यांची राष्ट्रीय संरक्षण समिती तर्फे दिल्ली येथे भेट आणि त्यांचे मार्गदर्शन दादाने घेतले होते.आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या चर्चा केली. तसेच 1 एप्रिल 1967 रोजी संसद भवनात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली, संजीव रेड्डी गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत आदरणीय दादा यांची उपस्थिती होती. गोळेगाव येथे कृषी विद्यालय होण्यासाठी बैठक या बैठकीला आडी सी व शिक्षण अधिकारी उपस्थित होते. तसेच कमिटीने दादांचे ही वैयक्तिक मत मागवले होते आणि दादा ही बैठकीला उपस्थित होते. 25 ऑक्टोंबर 1967 भैय्या साहेब, सुमंत गायकवाड परभणीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिवेशनासाठी दोन हजार लोक उपस्थित होते. या अधिवेशन घेण्यात दादांचा मोठा सहभाग होता. एक जुलै 1968 मुख्यमंत्री. मा. वसंतराव नाईक यांचा वाढदिवस रमाबाई आंबेडकर वस्तीग्रह साजरा केला होता या कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक हजर होते तसेच डीएसपी, कलेक्टर शंकरराव मानवतकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. 25 ऑगस्ट 1968 रोजी मौज धसाडी या गावातील बौद्ध समाजातील लोकांच्या शेतातील पिके सवर्ण समाजांनी गुरे चारून पिकाची नासाडी केली होती आणि नुकसान केले होते त्यासंदर्भात कलेक्टरशी, एस पी सी स्वतः दादा बोलले आणि प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजारांची आर्थिक मदत द्या अशी मागणी केलेली होती. 23 डिसेंबर 1968 रोजी हिंगोली नगर परिषद मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याचे काम दादांनी केले आहे. तसेच 5 मार्च 1969 मध्ये समाज कल्याण परभणी मध्ये दादांनी स्वतःच्या हाताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे. तसेच 27 मार्च 1969मध्ये मौजे कडोळी तालुका सेनगाव येथील सवर्णाच्या पद्धतीतून बौद्ध समाजाला उठवले व त्यांचा अपमान केला या संदर्भात एस पी सी भेट घेऊन दादांनी ते प्रकरण शांततेत मिटवले. महाराष्ट्रातील वाघ्या मुरुळी असतील, पोतराज असतील यांच्या हक्कासाठी दादांनी वेळोवळी आंदोलन मोर्चे केलेले आहे. 29 ऑगस्ट 1969 मध्ये मुळ्यांच्या मागण्यासाठी दादांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला होता. तसेच वेगवेगळ्या भागातील मुलांच्या मागण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी आदरणीय दादांनी संघटन केली व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले समाजकारणात बरोबर दादांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 1966 मध्ये जिल्हा परिषद च्या निवडणुकीमध्ये दादा भरघोस मतांनी निवडून आले आणि परभणी जिल्हा परिषद चे प्रथम समाज कल्याण सभापती पदाचा पदभार दादांनी स्वीकारलेला आहे. 1969 मध्ये लोकसभेवर मोर्चा काढला होता त्यावेळेस श्रीमती इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान होत्या त्यांना दादांनी निवेदन दिले. दादांनी आपल्या कारकिर्दीमध्ये समाजाला- चळवळीला न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. आंबेडकरी चळवळ जगली पाहिजेत तिच्यातून कृतिशील- सर्जनशील नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. हा त्यांचा शुद्ध हेतू होता. शेड्युल कास्ट फेडरेशनच्या मार्फत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दादांनी वेगवेगळे समाज हित्वर्धक कार्य केले आहे. 8 मार्च 1971 रोजी केंद्र बुद्रुक तालुका सेनगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या
भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी रा. सु. गवई, वामनराव नाईक आणि डी.एन.मोरे दादा उपस्थित होते. 23 मे 1971 रोजी पूर्णा येथील बुद्ध विहाराच्या उद्घाटनप्रसंगी माननीय बाबुरावजी पाटील गोरेगावकर वामनराव नाईक, बाबाराव नाईक आणि डी.एन.मोरे दादा यांची उपस्थिती होती. 14 एप्रिल 1974 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बौद्धवाडा पाथरी जिल्हा परभणी येथे दादा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दादांचे जन्मगाव मोठे गाव तालुका रिसोड येथे दादांनी 5 जून 1974 रोजी भूमिहीन सत्याग्रहासाठी वाशिम येथे सत्याग्रह केला होता. तसेच 20 जुलै 1974 रोजी मौजे आजेगाव तालुका सेनगाव इथे भूमिहीन मेळाव्याचे आयोजन केले होते. तेही दादांच्या नेतृत्वाखाली चालले. 31 ऑगस्ट 1974 रोजी परभणी येथे रेल्वे आवडल्याबद्दल परभणी कोर्टाने त्यांना नोटीस बजावली होती. 29 जानेवारी 1978 रोजी मौजे भगवती तालुका सेनगाव येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आदरणीय डी. एन. मोरेदादा यांच्या हस्ते करण्यात आले होते. 2 फेब्रुवारी 1979 रोजी आडगाव येथे जातीय दंगलीत जाळपोळ करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ आदरणीय डी.एन.मोरे दादांनी कलेक्टर ऑफिस कचेरीवर मोर्चा काढला होता. तसेच 18 ऑक्टोंबर 1979 रोजी आहेरवाडी मौजे येथे परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण दादांच्या हस्ते करण्यात आले आहे. दि. 4 डिसेंबर 1979 रोजी परभणी मध्ये भुमीहीन नेतृत्व केल्यामुळे दादांना 15जुन 1979 रोजी अटक करण्यात आली होती. दि. 10 डिसेंबर 1979 रोजी लोकसभा परभणी मतदार संघात दादांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता निशाणी हती होते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून ते उभे राहिले होते. त्यांना एकूण मतदान 6290 मिळाली होती स्थिती सहाव्या स्थानी होती. हे निवडणूक निकाल 1980मध्ये लागला होता. 18 जानेवारी 1980 रोजी बारावी नामांतर बैठक सचिवालय कार्यालय मुख्यमंत्री मुंबई येथे भरली होती. त्या बैठकीला दादा उपस्थित होते. दि. 21 जून 1980 रोजी डावी आघाडी सरकारच्या वतीने सत्याग्रह आणि कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केले होते. दि 24 ऑक्टोंबर 1981 रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सहजराव, भाऊसाहेब मोरे आणि दादा यांच्या हस्ते करण्यात आले होते. सहा सप्टेंबर 1982 रोजी नामांतर विरोधी मोर्चा कलेक्टर ऑफिस वर काढला होता. त्याच रात्री त्यांचे राहते घर हडको येथे काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि घर लुटून नेले त्या हल्ल्यात बेशुद्ध अवस्थेत पडले होते. शेजारच्या लोकांनी त्यांना सरकारी दवाखान्यांमध्ये दाखल केले आणि त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर एस पी नी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतले या हल्ल्यामागे कारण विचारले. म्हणजे या नामांतराच्या चळवळीत आंबेडकरवादी चळवळीत कार्य करत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता आपली प्रतिष्ठा पणाला दादांनी लावलेली होती. नामांतर सत्याग्रहा विरुद्ध कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढल्याप्रकरणी दादांना तुरुंगवास भोगावा लागला. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. हा त्यांचा आग्रह होता की त्यांची प्रबळ इच्छा होती. आणि त्यांच्या कार्याला यश आले. 28 एप्रिल 1983 रोजी मौजे कुपटा तालुका जिंतूर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाली आहे. दादांनी आपल्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत भीम पुकार कार्यालयात 7 जुलै 1984 रोजी अखिल भारतीय पत्रकार परिषद अध्यक्ष डोईफोडे यांच्या हस्ते दादांचा सत्कार व सन्मान करण्यात आला होता. 22 फेब्रुवारी 1985 रोजी हिंगोली लोकसभा निवडणुकीची सभा हाजी मस्तान, जोगेंद्र कवाडे, रा सु गवई यांच्या सभेसाठी दादांना विशेष निमंत्रण होते आणि दादा सभेला उपस्थित राहिले. मौजे शिवनी तालुका सेनगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. तसेच 11 नोव्हेंबर 1987 रोजी कळमनुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आदरणीय डी.एन.मोरे दादांच्या यांच्या हस्ते झाले आहे. 27 फेब्रुवारी 1987 रोजी टिळक भवन पुणे येथे दलित मित्र पुरस्कार यांनी राज्यपाल शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते दादांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे. दलित मित्र पुरस्काराच्या नंतर 15 ऑगस्ट 1989 रोजी त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मान बहाल करण्यात आला. 27 फेब्रुवारी 1983 रोजी आंबेडकर भावन उद्घाटन समारंभाच्या उपस्थित त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल आलिया वर्जन यांचे परभणीत आगमन झाल्यानंतर दादांनी त्यांचा सत्कार केला. दादांनी आपल्या आयुष्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यासोबतच शैक्षणिक कार्य केली आहे. मराठवाड्यातील पहिले मागासवर्गीय मुलीचे वस्तीगृह जिंतूर रोड परभणी येथे 1959 रोजी स्थापन केली होती.तसेच इंदिरा गांधी शिक्षण संस्थेची स्थापना 1974 रोजी केली आहे. आपला समाज सुशिक्षित झाला पाहिजे. स्वावलंबी झाला पाहिजे हा त्यांचा शैक्षणिक हेतू होता. समाज कल्याण च्या निधीतून आंबेडकर भवन योजना हिंगोली- परभणी जालना जिल्ह्यात राबवण्यासाठी दादांनी खूप मोठे प्रयत्न केले. परभणी - हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद व पंचायत समिती येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यास भाग पाडले. दादांनी हिंगोली येथील सिद्धार्थ नगर ची स्थापना केली व तिथे नगर बसवण्याचे काम दादांनी केले आहे. बहुजन चळवळीला, आंबेडकरी चळवळीला आपले प्रश्न, आपले दुःख व्यक्त करण्यासाठी चळवळीचे मुखपत्र म्हणून त्यांनी दैनिक शिल्पकार हे वर्तमानपत्र 2 ऑक्टोंबर 1977 रोजी सुरू केले. आणि हे वर्तमानपत्र त्यांचे सुपुत्र मा. भुषणजी मोरे हे चालवितात ही कौतुकास्पद बाब आहे. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारे शिल्पकार हे पहिले मराठवाड्यातील वर्तमानपत्र आहे. दैनिक शिल्पकाराने आंबेडकरी चळवळ जण सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचे काम केलेली आहे. आणि करीत आहे. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून शोषित- पीडित, वंचित समाजाच्या मागण्या, त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून आदरणीय डी. एन. मोरे दादांनी केली आहे. एक आष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले आणि पत्रकारीतेत भरीव कामगिरी केली आहे. दादांनी वेगवेगळ्या समितीवर सदस्य, सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समिती, स्वातंत्र्यसैनिक समिती, साक्षरता अभियान समिती, शांतता समिती, संजय गांधी निराधार योजना, अशा विविध समस्यांवर दादा सदस्य राहिलेले आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीवर असताना दादांनी लालबहादूर शास्त्री यांची सदिच्छा भेट घेतलेली होती. दक्षता समिती, होमगार्ड समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा वेगवेगळ्या समित्यांचे सल्लागार व स्थायी स्वरूपाचे सदस्य होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत आंबेडकरी चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. तिच्या माध्यमातून आपला समाज जागृत झाल्या पाहिजेत. संघटित झाला पाहिजेत. हा त्यांचा शुद्ध हेतू होता. पोलीस सुरक्षा समिती, मराठी पत्रकार भवनाचे ते संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष परभणी येथे राहिलेले आहेत. अखिल भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दादांनी काही काळ काम पाहिलेले आहे. परभणी येथील अखिल भारतीय नाट्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. कोतवाल समाज संघटना आणि वाल्मीकी समाज संघटना साठी त्यांनी काम केलेले आहे. कोतवाल संघटना आणि वाल्मिकी संघटना यांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले आहे. त्यांना आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी वेळोवेळी शासन दरबारी आंदोलन केली आहे. निवेदने दिली आहेत. त्यांनी रिपब्लिकन झोपडी संघामार्फत वेगवेगळ्या वस्त्या, गावे, झोपडपट्ट्या बसविण्याचे काम केले आहे. दादांचे कार्ये खूप व्यापक स्वरूपाचे आहेत. दादांना या आंबेडकरी चळवळीत दादांच्या अर्धांगिनी उपा. शशीकला आईसाहेबांचे खुपच योगदान दिले आहे. त्यांच्या भरीव पाठिंब्याने दादांनी हा समाजाचा रथ चालविला आहे. कोणत्याही कामासाठी कुटुंबातील सदस्यांची योगदान पाहिजे असते. ते दादांना आईसाहेबांकडून, मुला-मुलीकडू आणि आप्तस्नेही जणांकडून लाभले. आदरणीय दादा म्हणजे आंबेडकरी चळवळीतील एक कल्पक वटवृक्ष होते. त्यांच्या कार्याचा मी थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.आदरणीय डी. एन. मोरे दादांचा आज दि. 27 सप्टेंबर रोजी स्मृतिदिन आहे. या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनातील घटना प्रसंगाला उजाळा देणाचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असल्यास क्षमस्व आहे. आदरणीय डी.एन.मोरे दादांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आंबेडकरी चळवळीला प्रथम प्राधान्य दिले आहे. हा आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज दि 27 सप्टेंबर 2009 रोजी परभणी येथे हृदय विकाराच्या झटक्याने कायमचा शांत झाला. एक तुफानातील दिवा काळा आड होतो. ही खूप दु:खद घटना आहे. दादांचा 27 सप्टेंबर हा स्मृतिदिन डोळ्यासमोर ठेवून मी हा त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. दादा बद्दल जितके लिहावे तितके खूपच कमी आहे. त्यांचे कार्य विशाल आणि अफाट आहे ते शब्दात मांडणे शक्य नाही. जवळपास एक शतक दादांनी अनुभवले आहे. त्यांच्या या कार्याला त्यांच्या कोटी - कोटी विनम्र अभिवादन!!
प्रा. प्रकाश वाकळे, परभणी (आंबेडकरी चळवळ - साहित्य जगत)
0 Response to "आंबेडकरी चळवळीची क्रांतिकारी मशाल : डी. एन. मोरे "
एक टिप्पणी भेजें